8 वी ड
मी डोंबिवलीत जवळजवळ २४ वर्षे मुलांना शिकवले. मुले कुठली तर बॅक-बेंच वाली, नापास होणारी. पालकांची एकच अपेक्षा…. मुलाने वरच्या इयत्तेत जावे.
त्यामुळे हुशार मुले माझ्याकडे जवळ जवळ आलीच नाहीत.
फी पण जेमतेम घेत असे. खूप अनुभव आले. एकच सांगतो… शिक्षकाला खरे शिकवतात ती मुलेच. अशी एकेक इरसाल मुले-मुली. त्यांच्यामुळे मला खूपच बघायला मिळाले. गरिबी, त्यांची घरे, ती अशी का वागतात त्यांची उत्तरे मिळाली.
काही अनुभव माझ्या आयुष्याला चटका लावून गेले.
कदाचित माझी भाषा किंवा सांगण्याची पद्धत वेगळी वाटेल… पण जरूर वाचा, म्हणजे एक शिक्षक नुसता शिक्षक नसून त्याला समाजाचे भान असते हे लक्षात येईल.
तर हे पुस्तक जरूर वाचा. बरेच काही आठवेल, उमगेल.
सतीश चाफेकर
सवलत किंमत: ₹80
८ वी ड म्हटले की बरेच काही आठवेल. साहजिक आहे….. पण हा माझा प्रवास आहे का…. असेलही… कारण मी कधीच हुशार विद्यार्थी नव्हतो, पण बऱ्यापैकी… बी कॉम, बी ए, एम ए झालो.
पण शिक्षक म्हणून माझी कारकीर्द सुरू केली तेव्हा मात्र मी कटाक्षाने जी मस्ती करणारी, नापास होणारी, मागील बेंचवरील मुले यांना शिकवण्याचे ठरवले. त्याला कारणही तसेच घडले, माझ्या डोबिवलीमधील घराच्या बाजूला एक शिक्षक ज्या मुलाला फक्त ८० टक्के किंवा जास्त गुण असतील त्यालाच त्यांच्या क्लास मध्ये शिकवत.
मे महिना होता, मला कावीळ झालेली होती, मी माझ्या घरातच होतो. तितक्यात त्या शिक्षकांचा आवाज आला. ज्यांच्या मुलांना ८० टक्केच्या वर गुण असतील त्यांनीच या.
झाले माझी सटकली. काही दिवसांनी बरे वाटल्यावर कंपनीत गेल्यावर कंपनीचे मालक डॉ पटेल यांना भेटलो, सांगितले मला पुढे शिकायचं आहे, वेगळे काही करावयाचे आहे, नोकरी सोडू शकतो का ?
ते फक्त इतकेच म्हणाले…. सोड, पण परत नोकरीची गरज लागली तर इथेच ये.
इतके ग्रीनकार्ड बस होते. बायको निलिमा आणि तिच्या वडिलांना सांगितले. परंतु माझ्या आई-वडिलांना मी दोन वर्षानंतर सांगितले. उगाच त्यांचा इगो प्रॉब्लेम झाला असता. कारण बायको बँकेत नोकरी करत होती. अर्थात इगो प्रॉब्लेम माझ्या आईचा झाला असता, वडिलांचा नाही. कारण त्यांनी नीट समजून घेतले असते.
बऱ्यापैकी पगारावरून एकदम चारशे रुपये महिनावर आलो. हळू हळू मुलांची संख्या वाढत होती.
मी एकटाच शिकवत असे, सुट्टी असेल तर बायको शिकवत असे.
मी जवळ जवळ २४ वर्षे शिकवले. ते शिकवताना जे काही अनुभवत गेलो, शिकत गेलो ते म्हणजे…
” ८ वी ड”
बघा हे अनुभव कसे वाटतात ते. जरूर सांगा.
सतीश चाफेकर
8 vi d
Satish Chaphekar
Marathisrushti